मुंबई। नगर सहयाद्री-
जानेवारी ते मार्च या हंगामात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शयता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या तापमानात किंचित वाढ झाली आहे. सकाळी आणि रात्री गुलाबी थंडी तर दुपारी तापमानात वाढ दिसून येत आहे. राज्यासह देशात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची हजेरी पाहायला मिळत असून राज्यात पुढील ४८ तासांत पावसाची जोरदार एन्ट्री होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सातत्याने हवामानात बदल होत असल्यामुळे राज्यात पुन्हा ‘अवकाळी’ संकट निर्माण होणार असून पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील मराठवाडासह विदर्भात पुन्हा पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पुढील ४८ तासांत मराठवाडा आणि विदर्भात पावसासह गारपीट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. नाशिक, बुलढाणा, जालना, हिंगोली भागात गेल्या दोन दिवसात पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.