मुंबई। नगर सहयाद्री-
फेब्रवारी महिन्याच्या सुरवातीलाच हवामानात मोठा बदल पाहायला मिळत होता. राज्यात सकाळी थंडीची लाट पाहायला मिळत असून दुपारी मात्र उन्हाळा जाणवत आहे. बदलत्या हवामानामुळे महाराष्ट्रात पुढील २४ तासात पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार,महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे विदर्भ, आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाले आहेत. त्यामुळेच पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
रविवारी पूर्व मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका किंवा मध्यम पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हवामान हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.