Himachal Pradesh Rain : सोमवारी रात्री हिमाचल प्रदेशातील मंडी येथे ढगफुटीच्या १० घटना घडल्या. त्यामुळे आलेल्या पुरामुळे १६ जण बेपत्ता झाले. मंगळवारी संध्याकाळपर्यंत ५ मृतदेह बाहेर काढण्यात आले. ११ जणांचा शोध सुरू आहे. मंडीच्या कथुनागमध्ये अनेक घरे पुरात वाहून गेली आहेत. मंडीतील कारसोग, धरमपूर, बागशायद, थुनाग, गोहर परिसरातील १०० हून अधिक गावे वीज नसल्याने २४ तासांहून अधिक काळ काळवंडली आहेत.
आजही राज्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे गंगेच्या पाण्याची पातळी ताशी ५० मिमी वेगाने वाढत आहे. २४ तासांत पाण्याची पातळी २ मीटरने वाढली आहे. पाणी मणिकर्णिका घाटावर पोहोचले आहे, ज्यामुळे गंगा द्वारचा घाटाशी असलेला संपर्क तुटला आहे. लखीमपूरमध्ये शारदा नदी पूरग्रस्त आहे.
राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटर (एसईओसी) नुसार, पावसामुळे राज्यात एकूण ४०६ रस्ते बंद आहेत, त्यापैकी २४८ एकट्या मंडी जिल्ह्यात आहेत. मंडीमध्ये ९९४ ट्रान्सफॉर्मर देखील बाधित झाले आहेत. अधिकार्यांनी सांगितले की २४ घरे, १२ जनावरांचे गोठे, एक पूल आणि अनेक रस्ते खराब झाले आहेत, ३० गुरे मृत्युमुखी पडली आहेत आणि मंडी जिल्ह्यात अडकलेल्या नऊ लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.