मुंबई / नगर सह्याद्री :
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असताना आता राज्यात पुढील 24 तास महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून संपूर्ण कोकणासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचे रेड अलर्ट देण्यात आले आहेत. मुंबईला उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढील चार दिवस राज्यभरात पावसाचा जोर वाढणार असल्याचं IMD ने सांगितलंय.
हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यात पावसाचं स्वरूप आणखी तीव्र होणार आहे. बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासांत कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात विशेषतः कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवार, 25 जुलै 2025
रेड अलर्ट: रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग
ऑरेंज अलर्ट: ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, भंडारा
येलो अलर्ट: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर
शनिवार, 26 जुलै 2025
ऑरेंज अलर्ट: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, नाशिक, पालघर, गडचिरोली
येलो अलर्ट: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर
मुंबईत पावसाची तीव्रता वाढणार
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज (23 जुलै) दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्या म्हणजेच 24 जुलै रोजी पावसाची तीव्रता आणखी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी शक्यतो घरातच राहावे, सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
कोकणातील तिन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये उद्या अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाने या जिल्हयांना रेड अलर्ट जारी केला आहे. आज या तिन्ही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या भागांत पाणीपातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक प्रशासन सतर्क आहे.
विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार
विदर्भ व मराठवाडयातही पावसाचा जोर वाढणार असून आज (23 जुलै) संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पूर्वेकडील विदर्भातही आज पावसाचा जोर कायम राहणार असून पुढील चार दिवस विदर्भात तीव्र इशारे देण्यात आले आहेत. मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर पुढील चार दिवसांत वाढणार असून पावसाच्या जोरदार सरींची हजेरी लागेल असंही हवामान खात्यानं सांगितलंय.