अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व तंबाखू विक्री अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत तब्बल २ लाख ५६ रुपये किमतीचामुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून तयार मावा, सुगंधित तंबाखू व मावा तयार करण्याचे यंत्रसामुग्री हस्तगत करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेवरून आणि पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथकांनी १२ सप्टेंबर २०२५ रोजी ही कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अतुल लोटके, किशोर शिरसाठ, बाळासाहेब गुंजाळ, व सतीश भवर यांच्या पथकाने शेवगाव येथे छापा टाकला.
सागर श्रीराम लोखंडे (रा. दहिगाव, ता. शेवगाव), प्रविण यशोदास खरात (रा. सदर) युनुस सुलतान शेख (रा. सदर) त्यांच्याकडून १ लाख ७१ हजार५०० रुपयांचा मावा, तंबाखू व मावा तयार करण्याचे मशीन जप्त करण्यात आले. दुसऱ्या पथकातील पोलीस अंमलदार सुरेश माळी, राहुल डोके, बाळासाहेब खेडकर, सागर ससाणे, मनोज साखरे, व महादेव भांड यांच्या सहकार्याने पाथर्डी हद्दीत छापा टाकला. अभिजीत मिनानाथ लांडे (रा. आनंदनगर, पाथर्डी) या आरोपीकडून ८४ हजार ५०० रुपयांची सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आली. सर्व आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.