अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर तालुयातील साकत व वाळकी शिवारात काटवनात सुरू असलेल्या गावठी हातभट्ट्यांवर नगर तालुका पोलिसांनी रविवारी (दि. १७) सायंकाळी छापे टाकले. तयार गावठी हातभट्टीची दारू, रसायन असा २९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
साकत शिवारात सीना नदीच्या पात्रालगत काटवनात व वाळकी शिवारातील काटवनात गावठी हातभट्ट्या सुरू असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली होती. सहा. पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी एक पथक तयार करून सदर ठिकाणी छापे टाकण्यास सांगितले.
पथकाने सुरूवातीला साकत शिवारातील सीना नदी पात्रालगत सुरू असलेल्या हातभट्टीवर छापा टाकला. ३०० लिटर दारूचे रसायन व ४० लिटर तयार दारू असा १९ हजाराचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. पोलीसी अंमलदार भरत धुमाळ यांच्या फिर्यादीवरून हातभट्टी चालक मच्छिंद्र लहानु पवार (वय २४ रा. साकत खुर्द ता. नगर) याच्या विरोधात तालुका पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई वाळकी शिवारात केली. तेथे १० हजाराची १०० लिटर तयार दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. पोलीस अंमलदार बाळू चव्हाण यांच्या फिर्यादीवरून हातभट्टी चालक विलास हिरामन पवार (रा. धोंडेवाडी, वाळकी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध धंद्यांना सुगीचे दिवस!
नगर तालुका पोलिस ठाण्याचा पदभार घेताच सहा. पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी हातभट्ट्यांवर छापेमारी करत कारवाई केली. तसेच आताही हातभट्ट्यांवर कारवाई केली. परंतु, तालुक्यात अनेक भागात अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे. त्यांच्याकडे मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. गांजा, गुटखा, मावा, देशी, विदेशी दारु विक्रेत्यांवर कारवाई होतांना दिसत नाही. त्यांच्यावर कारवाईचा मुहूर्त लागणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.