सफरचंदाच्या पेट्यांनी भरलेले दोन ट्रक परस्पर विकले / एमआयडीसी पोलिसांत भोपाळ, बुलढाणा, राजस्थान येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर । नगर सहयाद्री
सफरचंदाच्या दोन गाड्यांमधील माल परस्पर विकून शहरातील एका फळ व्यापाऱ्याची तब्बल १८ लाख ९९ हजार ९३२ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शेंडी (ता. जि. अहिल्यानगर) येथे २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान घडली.
याप्रकरणी संतोष प्रभु ढवळे (वय ४६, धंदा- फळाचा व्यापार, रा. माळीवाडा, अहिल्यानगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची तक्रार गुरुवारी (दि. ३०) रोजी रात्री नोंदवण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढवळे यांचा फळांचा व्यापार आहे. त्यांनी आरोपींकडे सफरचंदाच्या पेट्यांनी भरलेले दोन ट्रक (क्र. RJ 14 GR 6334 आणि DD 01 R-9942) पाठवले होते. मात्र, आरोपींनी संगनमत करून हा माल परस्पर विकून टाकला.
यामध्ये ६ लाख ६९ हजार रुपयांच्या ५०५ फुल पेट्या व ७२ हाफ पेट्या आणि दुसऱ्या गाडीतील १२ लाख ३० हजार रुपयांच्या ७०३ फुल पेट्या, असा एकूण १८,९९,९३२ रुपयांचा माल होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संतोष ढवळे यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सत्यनारायण पांडे (रा. भोपाळ, मध्यप्रदेश), मोईन शेख मुन्शी, बागवान (रा. बुलढाणा), शफी बागवान (रा. बुलढाणा) आणि देंवेंद्र पंडीत (रा. किसनगढ-बास, अलवर, राजस्थान) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हातमापुरा चौकात महिलेस मारहाण
अहिल्यानगर । नगर सहयाद्री
शहरातील हातमापुरा चौक परिसरात मुलांच्या खेळण्यातील किरकोळ वादातून एका ३९ वर्षीय महिलेस आणि तिच्या कुटुंबीयांना लोखंडी रॉडसह आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी पुष्कर, महादेव, शिवाजी आणि भगवान काळभोर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पीडित महिला आपल्या कुटुंबासह हातमापुरा चौकात राहत होती. गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास तिचा भाचा घरासमोर खेळत असताना शेजारी मुलांनी त्याला मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी महिला शेजारी काळभोर कुटुंबीयांच्या घरी गेल्या असता, पुष्कर काळभोर यांनी त्यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ केली. पुढे ‘आमच्या नादाला लागू नका, नाहीतर तुम्हा सर्वांना जीवे सोडणार नाही’ अशी धमकी देत पुष्कर काळभोरने लोखंडी रॉडने पीडित महिलेच्या पायावर आणि हातावर मारहाण केली. पीडितेने आरडाओरड केल्यावर तिची आई व बहीण भांडण सोडवण्यासाठी मध्ये आल्या, यावेळी महादेव, शिवाजी आणि भगवान काळभोर यांनी देखील त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे.
जखमी महिलेने सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचा पुढील तपास सपोनि/एस. पी. बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा
अहिल्यानगर
नालेगाव परिसरात घरगुती गॅस सिलेंडर थेट ऑटोरिक्षामध्ये अवैधरीत्या रिफिलिंग करणाऱ्या मोठ्या अड्ड्यावर अन्न पुरवठा विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी छापा टाकला. अमरधाम जवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या या गोरखधंद्याचा शोध घेताच आरोपी आणि रिक्षाचालक दोघेही घटनास्थळावरून पळ काढले. पुरवठा निरीक्षक तेजस बाबूलाल पाटील (वय २४) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास अमरधाम जवळील मारुती मंदिरासमोरील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला गेला. छाप्यात आढळले की, अज्ञात व्यक्ती घरगुती सिलेंडरला इलेक्ट्रिक मोटार व पाईप जोडून काळ्या रंगाच्या तीनचाकी ऑटोरिक्षामध्ये गॅस भरत होते. घटनास्थळावरून पथकाने १० घरगुती गॅस टाक्या, एक टायटन कंपनीचा वजन काटा, इलेक्ट्रिक सक्शन मोटार व नोझल, एक मोबाईल फोन आणि रिक्षा असा एकूण ६४,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शेडमध्ये सतीश टेकाळे व स्वामी गणेश नावाची पासबुके व हिशोबाच्या दोन नोंदवह्या देखील सापडल्या. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध लोकांच्या जीवितास धोका निर्माण करण्याप्रकरणी तसेच जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; दोन ठिकाणी छापे, ‘ईतक्या’ लाखांचा गुटखा जप्त
अहिल्यानगर
शहरातील प्रतिबंधित गुटखा विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) गुरुवारी धडक कारवाई केली. निंबळक बायपास उड्डाणपुलाजवळील एका किराणा दुकान आणि विळद घाट येथील हॉटेल हर्षदामध्ये छापे टाकून पथकाने सुमारे ३,९५,५८५ रुपयांचा विमल, राजश्री, गोवा पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. या प्रकरणी बापु मच्छिंद्र कोतकर (वय ४०, रा. निंबळक बायपास) आणि माऊली उर्फ ज्ञानेश्वर गायकवाड (रा. हॉटेल हर्षदा, विळद घाट) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू त्रिंबक भागवत यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की दोन्ही ठिकाणी प्रतिबंधित गुटखा विकला जात आहे. त्यानुसार, पथकाने गुरुवारी सकाळी १०:३७ च्या सुमारास एकाच वेळी छापा टाकला. छाप्यात पोलिसांना राजश्री, ब्लॅक लेबल, विमल, गोवा पानमसाला, जर्दा आणि विविध प्रकारच्या सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. महाराष्ट्र राज्यात बंदी असूनही विक्रीच्या उद्देशाने साठा बाळगल्याप्रकरणी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ८१५/२०२५ अन्वये भारतीय नवीन संहितेच्या विविध कलमांनुसार नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.
शेजाऱ्याने केला तरुणावर चाकू हल्ला
अहिल्यानगर
लाल टाकी येथील बारस्कर कॉलनीत बुधवारी (दि. २९) रात्री साडेनऊच्या सुमारास आईला मारहाणीचा जाब विचारल्याच्या रागातून शेजाऱ्याने एका तरुणावर चाकूने हल्ला केला. या घटनेत ओंकार रवींद्र ननवरे (वय २५, रा. लाल टाकी) जखमी झाले. त्यानुसार, ओंकार यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपी आशिफ इकबाल खान (वय ३०, रा. लाल टाकी) यांच्या विरोधात फिर्याद दिली. ओंकार घराच्या दारात झोपलेले असताना शेजारी राहणारा आरोपी आशिफ खान त्यांच्या सासूला विनाकारण शिवीगाळ करत होता. ओंकार यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.“माझ्या आईला मारहाण का करतो,” असे ओंकार यांनी विचारल्यावर आरोपी आशिफ खान प्रचंड रागावला. त्यानंतर त्याने घरातील किचनमधून धारदार चाकू आणून ओंकार यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ओंकार यांच्या डाव्या हातावर, पाठीवर आणि उजव्या गालावर चाकूचे जखमा झाल्या. जखमी ओंकार यांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आणि नंतर पोलिसांना धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून आशिफ खान यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



 
                                    
