अहिल्यानगर ।नगर सहयाद्री
नगर शहरात सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यांवर अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी मावा तयार करण्याच्या दोन मशीनरीसह अवैध सुगंधी तंबाखू असा २ लाख ८९ हजार १२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई नगर शहरातील सावेडी उपनगरातील पाइपलाईन रोड परिसरातील श्रीराम चौकात करण्यात आली. अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला शहरात अवैधरित्या सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या कारखान्यांबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने बुधवारी छापा टाकला.
श्रीराम चौकातील नवनाथ पान स्टॉल तसेच नवनाथ बंगला येथे मावा मिक्सर मशीनच्या साहाय्याने सुगंधी तंबाखू आणि मावा तयार केला जात होता. पोलिसांनी तातडीने छापा टाकून तपासणी केली असता, २ मावा मिक्सर मशीन सुगंधित तंबाखु असा २ लाख ८९ हजार १२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने सुगंधी तंबाखू आणि माव्यासारख्या शरीरास अपायकारक पदार्थांच्या निर्मिती आणि विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही, काही व्यक्ती स्थानिक पातळीवर अशा अवैध कारखान्यांद्वारे हे पदार्थ तयार करून विक्री करत असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.