परभणी / नगर सह्याद्री –
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येवरून राज्यातील राजकारण तापलंय. सूर्यवंशी यांच्या मृत्यूसाठी पोलीस जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आता काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूसाठी मुख्यमंत्री जबाबदार आहेत. तर पोलिसांनीच त्यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय.
सोमनाथ सूर्यवंशी याला मारले आणि त्याची हत्या केली. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरएसएसची विचारधारा जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. राहुल गांधी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यामध्ये २० ते २५ मिनिटे चर्चा झाली. राहुल गांधी यांच्यासोबत बोलताना सूर्यवंशी कुटुंबिय भावूक झाले होते.
परभणी प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटं बोलले आहेत. परभणीमधील घटनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. या ठिकाणी कोणतेही राजकारण होत नाही. आरएसएसची विचारधारा संविधानविरोधी असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर शिंदे सेनेची टीका
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केलाय. राहुल गांधी राजकारण करण्यासाठी आले आहे. कोण गेलं? कोण राहिले? याच्यापेक्षा त्यांना घटनेचे पुस्तक घेऊन फिरायचं आहे. घटनेचे पुस्तक घेऊन त्यांना दाखवायचे आहे, की आम्ही घटना मानणारे आहोत, असे संजय शिरसाट म्हणाले.
राहुल गांधी ड्रामेबाजी करत आहेत, त्यांना लोकांच्या समस्येचं देणंघेणं नाही. त्यांना त्या कुटुंबियांचं देणंघेणं नाही , त्यांच्या पक्षाला मिळालेला विषय तेच घेऊन चघळत बसतात. आम्ही सर्व लोकांचे नेते आहोत, हे दाखवण्याचा ती प्रयत्न करतात, त्यांच्या नौटंकीला लोक जुमानणार नाहीत, असं हल्लाबोल संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केला.