नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राज्यातील पूरग्रस्त पीडित शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक मंत्र्यांनी दौरे सुरू केले आहेत. तसेच, काहीजण आपल्या परीने मदतीचाही हात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर असून राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे मदतीची मागणी करणार आहेत, तर, काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्याची शक्यता असून दसऱ्या आधीच राहुल गांधी मराठवाड्यातील पूरग्रस्त पीडितांची भेट घेऊ शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली. तसेच, आपल्या दौऱ्यात कल्याणमधील साडी प्रकरणातील जेष्ठ कार्यकर्त्याची भेट घेऊन काँग्रेसच्यावतीने त्यांचा सन्मानही केला जाणार असल्याचे समजते.
कल्याणमधील काँग्रेस ज्येष्ठ पदाधिकारी मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट त्यांना कोणी तरी पाठविली होती, ती त्यांनी पुढे फॉरवर्ड केली. त्यामुळे, पगारे यांनी पंतप्रधान मोदी यांचा अपमान केल्याचे सांगत भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि पदाधिकारी संदीप माळी यांना पगारे यांना भररस्त्यात गाठून साडी नेसविली होती. या घटनेवरुन काँग्रेस आणि भाजप आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. भाजप पदाधिकाऱ्यांनी भररस्त्यात साडी नेसवून अवमान केल्यानंतर मामा पगारे हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे रुग्णालयात असताना गुरुवारी राहूल गांधी यांनी मामा पगारेंशी संवाद साधला. मामा तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्यासोबत आहे. आम्हाला तुमच्याबद्दल बाळासाहेब थोरातांनी माहिती दिली आहे. 50 वर्षापासून तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात, तुमचा खूप आदर आहे, अशा शब्दात राहुल गांधींनी मामा पगारे यांना धीर दिला. तसेच, लवकरच भेट घेणार असल्याचे आश्वासनही दिले. त्यानंतर, आता राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यासाठी महाराष्ट्रात येत असल्याची माहिती असून याच दौऱ्यात ते मामा पगारे यांचीही भेट घेणार आहेत.
दरम्यान. राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून बळीराजाची शेती पाण्याखाली गेली आहे. कित्येक शेतातील मातीही पिकांसोबत वाहून गेल्याने जगावं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. आता, हा बळीराजा सरकारकडे अपेक्षा लावून बसलाय.
आरोपींवर गुन्हा दाखल
काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मामा पगारे यांना साडी नेसविल्याचे प्रकरण समोर आले असून भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजप पदाधिकारी संदीप माळी, दत्ता मयेकरसह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. टिळकनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून ॲट्रॉसिटी दाखल न झाल्याने आपण कोर्टात दाद मागणार असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी म्हटलं.
राज ठाकरेंचाही मराठवाडा दौरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही मराठवाड्याचा दौरा करणार आहेत, उद्या आणि परवा येथील अतिवृष्टी झालेल्या भागांना राज ठाकरे भेट देत पाहणी करणार आहेत. लातूर, धाराशिव आणि बीड येथे जाऊन राज ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.