नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी व्होट चोरीवरून पुन्हा एकदा भाजप आणि आयोगावर हल्ला चढवला. मतचोरीवरून राहुल गांधी यांनी नवी दिल्लीमध्ये सत्ताधाऱ्यांना घेरलं. पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी व्हिडिओ आणि फाईल दाखवत गंभीर आरोप केला आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये एकाच व्यक्तीने मतदान केल्याचा दावाही त्यांनी केला. हरियाणामध्ये २५ लाखांची मतचोरी झाल्याचा दावा केला आहे. निवडणूक आयोग मतदारांची दिशाभूल करतो. हरियाणामध्ये एक लाखांपेक्षा जास्त जणांचा पत्ता चुकीचा आहे.
बिहारमध्ये गुरुवारी १२१ विधानसभा जागांसाठ मतदान होणार आहे. त्याआधी राहुल गांधींकडून हायड्रोजन बॉम्ब टाकण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि बिहारमधील पुरावे सादर केले. हरियाणामध्ये घर क्रमांक ५१ मध्ये ६६ जण राहात असल्याचे आयोगाच्या मतदार यादीत दिसतेय. खरेच एका ठिकाणी इतके लोक राहतात का? आयोगाने याबाबत पडताळणी केली होती? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी बिहारमधील एका व्यक्तीचे लाईव्ह उदाहरण दिलेय. अनुपस्थिती असल्यामुळे आयोगाकडून नाव काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बाहिरामधील १८७ मते काढल्याचाही संबंधित तरूणाने म्हटले. ब्रिझलची मॉडेल हरियाणाच्या मतदार यादीमध्ये असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
एकाच बूथवर एकाच महिलेचे २२३ वेळा नाव
एकाच बूथवर त्याच महिलेचे नाव २२३ वेळा आल्याचा दावा करत राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने त्या महिलेने किती वेळा मतदान केले याचे उत्तर द्यावे. यासाठी निवडणूक आयोगाचे आभार मानले पाहिजेत. म्हणूनच सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या बूथवर काय घडले ते उघड झाले असते. एका मुलीने १० ठिकाणी मतदान केले. बनावट फोटो असलेले १,२४,१७७ मतदार होते. मतदार यादीत नऊ ठिकाणी एका महिलेने मतदान केले.
एका तरुणीने २२ मते दिली – राहुल गांधी
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत एका तरुणीचा फोटो दाखवण्यात आला. या फोटोसोबत २२ ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी मतदान केल्याचे आरोप करण्यात आले. राहुल गांधी म्हणाले की, या तरुणीने कधी सीमा नावाने तर कधी सरस्वती नावाने २२ मते टाकली. त्यानंतर राहुल गांधींनी विचारले की, हरियाणाच्या मतदार यादीत ही ब्राझिलियन महिला काय करत आहे. हरियाणात २५ लाख मते चोरीला गेली. ५ लाख २१ हजारांहून अधिक डुप्लिकेट मतदार सापडले आहेत. हरियाणात एकूण २ कोटी मतदार आहेत. २५ लाख मते चोरीला गेली म्हणजे दर आठ मतदारांपैकी एक बोगस होता. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला, असे राहुल गांधी म्हणाले..
हरियाणामध्ये जे घडले ते बिहारमध्येही घडेल – राहुल गांधी
यावेळी राहुल गांधी यांनी आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, हरियाणामध्ये जे घडले तेच आता बिहारमध्येही घडेल. बिहारमधील मतदार यादीत घोटाळे झाले आहेत. मतदार यादी आम्हाला शेवटच्या क्षणी देण्यात आली. पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधींनी बिहारमधील अनेक मतदारांना मंचावर आमंत्रित केले आणि दावा केला की त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.



