अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शिराढोण (ता. अहिल्यानगर) शिवारात उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका तरूणावर सहा जणांनी लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.
या प्रकरणी जखमी दीपक एकनाथ क्षीरसागर (वय 38 रा. शिराढोण) यांच्या जबाबावरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल म्हस्के, कृष्णा म्हस्के, पप्पू राजापुरे, विशाल (पूर्ण नाव माहित नाही) व दोन अनोळखी इसम (सर्व रा. दहिगाव, ता. अहिल्यानगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता शिराढोण येथे फिर्यादीच्या घरासमोर घडली.
दीपक क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपींनी मिळून एक हजार रूपयांच्या उधारीवरून हा हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी दीपक क्षीरसागर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी (15 एप्रिल) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस अंमलदार खरमाळे करीत आहेत.