राळेगणसिद्धीच्या तिघांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरालगत असलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेऊर गावाजवळील टोलनाक्यावर १५ नोव्हेंबरच्या रात्री एक धक्कादायक घटना घडली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाच्या पोटावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अंकुश हेमंत काळे (वय २५, रा. बहिरवाडी, ता. जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेच्या दिवशी रात्री ९ च्या सुमारास अंकुश हे आपल्या मित्रासोबत डंपरमध्ये डिझेल भरण्यासाठी जेऊर येथील पेट्रोलपंपावर गेले होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी काहीही कारण नसताना त्यांना शिवीगाळ केली आणि तेथून पळ काढला.
संतापलेल्या अंकुश यांनी त्यांचा पाठलाग केला आणि बंद असलेल्या टोलनाक्याजवळ त्यांना गाठले. यावेळी झालेल्या झटापटीत मुख्य आरोपी भूषण उर्फ अमोल पटारे याने आपल्याकडील चाकूने अंकुश यांच्या पोटावर आणि छातीच्या खाली वार करून त्यांना जखमी केले. तसेच त्याचे साथीदार प्रमोद मापारी आणि पोपट पटारे (सर्व रा. राळेगणसिद्धी, ता. पारनेर) यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या गंभीर घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवटे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



