समर्थकांना महसूलमंत्रिपद मिळण्याची आशा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
मागील महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीला १२ पैकी १० जागा मिळाल्या. त्यातील शिर्डीचे आमदार तथा माजी महसूलमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळाले आहे. यातील महायुतीला अनेका जागांच्या विजयामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका निभावल्यामुळे त्यांचे मंत्रिमंडळातील स्थान पक्के झाले होते. राज्य सरकारमध्ये विखे पाटील हे सातव्यांदा मंत्री झाले आहेत. दरम्यान समर्थकांनी महसूलमंत्रिपद मिळण्याची आशा व्यक्त केली आहे.
राज्याच्या विधानसभेत सलग आठ वेळा शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आणि सात वेळा विविध विभागांच्या मंत्रिपदाची यशस्वी धुरा सांभाळणारे राधाकृष्ण विखे पाटील यांचा महायुतीच्या मंत्रिमंडळात रविवारी (दि. १५) दुसर्यांदा झालेला समावेश अहिल्यानगरच्या राजकीय क्षेत्रात वर्चस्व सिद्ध करणारा ठरला आहे. राज्याचे मंत्री म्हणून विखे पाटील यांनी आजपर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत सातव्यांदा शपथ घेतली. विखे पाटील यांना मंत्रिपद मिळणार यात कोणतीही शंका नव्हतीच; कोणत्या खात्याचे मंत्रिपद मिळते, याबाबत उत्सुकता मात्र आहे. मागील टर्मप्रमाणेच पुन्हा महसूलमंत्रिपद मिळण्याची आशा त्यांच्या समर्थकांना आहे. दरम्यान मंत्रीपदाची शपथ घेताच विखे समर्थकांनी राहाता, शिर्डी, संगमनेर, पारनेर, नगरमध्ये जल्लोष साजरा केला.
सहकार चळवळीची असलेली पार्श्वभूमी आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या राजकीय सामाजिक चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून वाटचाल करणारे विखे पाटील यांनी सहकार क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये पदे भूषवून या क्षेत्रात नवनिर्मिती केली. सहकाराबरोबरच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी आपल्या दूरदृष्टीतून संस्थांचा पाया अधिक भक्कम केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास पूर्ण झालेली ७५ वर्षे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची ५० वर्षांची यशस्वी वाटचाल आणि सहकारी बँकिंग क्षेत्रात लौकिक प्राप्त केलेल्या प्रवरा सहकारी बँकेस पूर्ण झालेली ५० वर्षे या सर्वांत राधाकृष्ण विखे पाटील यांचे अभ्यासू नेतृत्व उपयुक्त ठरले आहे.
१९९५ पासून शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. राहाता तालुयाच्या निर्मितीपासून ते अलीकडच्या काळात स्थापन झालेले अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, काकडीचे विमानतळ, न्यायालयाची स्वतंत्र इमारत अशा अनेक ठळक बाबी या त्यांच्या विकासाच्या वाटचालीतील मानबिंदू ठरले आहेत. विकासकामांच्या सक्रियतेमुळेच शिर्डी मतदारसंघातून सलग आठव्यांदा चांगल्या मताधियाने निवडून जाण्याचा विक्रमही त्यांनी नोंदविला आहे.
कोणत्याही मंत्रिपदाची जबाबदारी आली की, त्या विभागाचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात आहे. सरकार आणि संघटना यांचा योग्य समन्वय साधून काम करण्याचा मोठा अनुभव विखे पाटील यांच्या पाठीशी असल्यामुळे जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेला यामुळे गती मिळाल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी शिवसेना-भाजपचे सरकार असताना १९९७ ते ९९ या कार्यकाळात कृषी, जलसंधारण, दुग्धव्यवसाय या विभागांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. या काळात अॅग्रो अॅडव्हाटेज हे कृषी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवून त्यांनी आपल्या कार्याची वेगळी ओळख करून दिली होती.