नगरसेवक पठारेंना पोलीस कोठडी | परस्परविरोधी फिर्याद | पठारेंचे १० लाख चोरले
पारनेर | नगर सह्याद्री
शहरातील गणपती देवस्थानच्या जमिनींवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरुन वादावादी झाली. देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य सुनील चौधरी यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक युवराज पठारे यांच्यासह एकूण १२ जणांविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विश्वस्त चौधरी यांच्याविरोधात पठारे यांच्या घरातून १० लाख १० हजार रुपये किंमतीचे २२० ग्रॅम सोने चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण व चोरीच्या घटना गुरुवारी (२६ डिसेंबर) घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक युवराज पठारे यांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची (३१ डिसेंबर) पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी सांगितले.
सुनील भाऊसाहेब चौधरी (रा. डिकसळ, पारनेर) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पारनेर शहरात सुपे रस्त्यालगत गणपती देवस्थानची तब्बल ३६ एकर जमीन आहे. देवस्थानच्या चुलते जागेवर युवराज कुंडलीक पठारे, नामदेव पठारे व बाळासाहेब पठारे व इतरांनी अतिक्रमण केलेले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी २०१८ मध्ये देवस्थानच्या ट्रस्टींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने जिल्हाधिकार्यांमार्फत पारनेर नगरपंचायतकडे हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. सात दिवसांपूर्वी नगरपंचायतीच्या वतीने अतिक्रमणधारकांना या नोटीस बजाण्यात आल्या होत्या. नोटीस बजावल्यानंतर पारनेर न्यायालयात युवराज पठारे यांची भेट झाली, त्यावेळी त्याने यात पडू नकोस नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे चौधरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
नोटीस देऊनही अतिक्रमण न काढल्याने गुरुवारी (२६ डिसेंबर) सकाळी सचिव सुधीर देवीदास पाठक यांच्या सांगण्यावरून सुनील चौधरी हे मुख्याधिकारी विनय शिपाई यांच्याकडे गेले होते. तेथे चर्चा सुरू असताना युवराज पठारे व इतर दौघे तेथे आले. मुख्याधिकारी शिपाई यांच्यासमोर युवराज पठारे यांनी धमकी दिली. चौधरी याने देवस्थानचा ट्रस्टी असल्याचे सांगताच मुख्याधिकारी शिपाई यांच्यासमक्ष युवराज व इतर दोघांनी चौधरी यांना उचलून कार्यालयाबाहेर आणून जीपमध्ये बसवले. जीपमध्येच मारहाण केली. नंतर पठारे यांच्या घरात खोलीत कोंडून मारहाण केली. त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. मोटारसायकलची, पैशांचे पाकीटही काढून घेतले. युवराज कुंडलिक पठारे, त्याचा भाऊ यशवंत उर्फ आबा कुंडलिक पठारे, बाळासाहेब पठारे, युवराजचे वडिल कुंडलिक पठारे व युवराजची पत्नी व इतर सात ते आठ जणांनी मारहाण केली.दरम्यान, पठारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नगरपंचायतीच्या कार्यालयात कामानिमित्त गेलो असताना सुनील चौधरी माझ्या घरी गेला. तसे मला माझ्या पत्नीने मला कळवले. मी घरी जाईपर्यंत सुनील चौधरीने घरातील १० लाख १० हजार रुपये किंमतीचे २२० ग्रॅम सोने चोरले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.