अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात काही युवकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी दोन्ही बाजूने जमाव जमला होता. किरकोळ दगडफेकही झाली. यात एक युवक जखमी झाला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मंगळवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास निलक्रांती चौकातून बालिकाश्रम रस्त्याकडे जाणार्या रस्त्यावर काही युवकांमध्ये पतंग उडविण्याच्या वादातून व गाणे लावल्यावरून वाद झाले. झटापट होऊन हाणामारी झाली. यात एक युवक जखमी झाला. तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगवले.
त्यानंतर काही वेळातच चौकाच्या दुसर्या बाजूने किरकोळ दगड फेकण्यात आले.जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.