अहमदनगर । नगर सहयाद्री:-
पूर्वाश्रमीचा राजकीय वाद व खुन्नस देण्यावरून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप समर्थक कार्यकर्ते व शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांचे पुत्र ओंकार सातपुते यांच्यात सक्कर चौकात बाचाबाची व झटापट झाली. यावेळी काहींच्या हातात दांडकेही होते. काहीवेळातच दिलीप सातपुतेही तेथे पोहचले. यावेळीही दोन्ही गटात बाचाबाची झाली.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास सक्कर येथे दोन्ही गटात राडा झाला. यात दोन्ही गटाकडून परस्परांना किरकोळ मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी, राडा सुरू असतानाच दिलीप सातपुते त्यांच्या समर्थकांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या वादावर तात्पुरता पडदा घालण्यात आला. मात्र, या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर दोन्ही गटाच्या शेकडो समर्थकांनी आमदार जगताप व सातपुते यांच्या कार्यालयात गर्दी केली होती. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून सायंकाळी उशिरापर्यंत बंदोबस्त ठेवला होता.
घटनेनंतर दोन्ही गटाकडून सोशल मीडियातील पोस्टद्वारे, व्हिडिओद्वारे एकमेकांना आव्हान देण्यात येत आहे. त्यामुळे काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, दोन्ही गटाकडून फिर्यादी न आल्याने कोतवाली पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन राडा करणार्यांवर गुन्हे दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले. व्हिडिओ व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी शोधण्यात येत असल्याचेही दराडे यांनी सांगितले.