अहिल्यानगर / नगर सह्याद्री
किरकोळ वादातून हॉटेलमध्ये दोघांनी एकाच्या डोक्यात बाटली फोडली. तसेच, त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्याच्या मित्रालाही मारहाण केली. संजय राजेंद्र परदेशी (वय 26, रा. मंगलगेट, अहिल्यानगर) असे जखमीचे नाव आहे. हॉटेल पिंगारा येथे ही घडली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय राजेंद्र परदेशी हे त्यांचं मित्र अमित कैलास सुरसे याच्यासमवेत शनिवारी रात्री हॉटेलमध्ये जेवण करत असताना त्यांनी वेटरला पाणी मागण्यासाठी आवाज दिला. त्यावेळी बाजूच्या टेबलवर बसलेल्या अक्षय आडेप याने एवढ्या मोठ्याने का आवाज देतो असे म्हटले. आम्ही वेटरला आवाज देत असून तुमचा काही संबंध नाही, असे परदेशी यांनी म्हटल्याने अक्षय आडेप याने टेबलवरील काचेची दारूची बाटली परदेशी यांच्या डोक्यात मारली. यात परदेशी जखमी झाले. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमित सुरसे यालाही अक्षय आणि त्याच्या दोन अनोळखी मित्रांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.