अहमदनगर / नहार सह्याद्री –
नवनागापूरच्या चेतना कॉलनीत दोन गटांत तलवार, रॉड, दांडक्याने झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघांच्या खूनाचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (8 सप्टेंबर) रात्री साडेसात वाजता घडली. प्रफुल्ल आण्णासाहेब पराड (वय 29 रा. शिवाजीनगर, चेतना कॉलनी) व मनोज सहादू भिंगारदिवे (वय 30 रा. बोल्हेगाव फाटा) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी प्रफुल्ल पराड यांनी दिलेल्या जबाबावरून मनोज भिंगारदिवे विरोधात खूनाचा प्रयत्न कलमानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतना कॉलनीत रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास भांडण सुरू होते. ते भांडण सोडविण्यासाठी प्रफुल्ल तेथे गेले होते. ते मनोजला समजून सांगत असताना त्याने प्रफुल्ल यांना शिवीगाळ करून धारधार हत्याराने त्यांच्या पोटात डावे बाजूला बरगडीवर मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
जखमी मनोज भिंगारदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रफुल्ल ऊर्फ सोनु आण्णासाहेब पराड, शुभम आण्णासाहेब पराड, जालिंदर चंचलनाथ साळवे, अनिता जालींदर साळवे, रूपाली जालींदर साळवे, पुनम जालींदर साळवे, ऋतुजा जालींदर साळवे (सर्व रा. चेतना कॉलनी) व एक अनोळखी विरोधात खूनाचा प्रयत्न कमलानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज यांनी कोर्टात दाखल केलेली याचीका परत मागे घ्यावी म्हणून त्यांना संशयित आरोपी यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘तु केस मागे घेतली नाहीस तर तुला जिवे ठार मारून टाकू’ अशी धमकी दिली. तसेच प्रफुल्लने तलवारीने मनोजवर वार करून जखमी केले. शुभमने लाकडी दांडक्याने मारहाण केली. अनोळखी व्यक्तीने रॉडने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.