मंगळवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसाठी पारनेर येथे निवड प्रक्रिया
पारनेर | नगर सह्याद्री
सहकारी दृष्ट्या नव्हे तर राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेली पारनेर तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा अॅड. बाबासाहेब खिलारी व उपाध्यक्ष पदाचा राजीनामा गंगाधर रोहकले यांनी वरिष्ठांच्या आदेशाने दिल्यानंतर आता नव्या पदाधिकारी नेमणूक येत्या मंगळवारी होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया प्रशासकीय पातळीवरून पार पडणार आहे.
राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजली जाणारी ही सहकारी संस्थेमध्ये आता अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. अनेक संचालकांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नेत्यांकडे फिल्डींग लावली असल्याची माहिती आहे.
माजी खासदार सुजय विखे व आमदार काशिनाथ दाते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, भाजप नेते विश्वनाथ कोरडे यांच्या निर्णयाने अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले जाणार असले तरी संचालक मंडळामध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे या खरेदी विक्री संघावर एक हाती वर्चस्व आहे. त्यामुळेच वरिष्ठ राजकीय नेते आता इच्छुकांना कसा न्याय देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.पारनेर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित, पारनेर, यांच्या नोंदणीकृत उपविधीतील तरतुदींनुसार चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या पदांच्या निवडीसाठी विशेष संचालक मंडळ सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये विकास जाधव, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, पारनेर यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही २९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, पारनेर यांच्या कार्यालयात, चेडे बिल्डींग, कॉलेज रोड, पारनेर येथे होणार आहे. या सभेत संचालक मंडळामधून चेअरमन आणि व्हा. चेअरमन या पदाधिकार्यांची निवड केली जाणार आहे. सर्व संचालकांना सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार व्हावी यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत.