R Ashwin Retirement: गाबा कसोटीचा निकाल लागताच रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू म्हणून आजचा माझा शेवटचा दिवस असेल असे म्हणत अश्विनने निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. अश्विनने गाबा कसोटीत पावसामुळे सामना थांबला होता तेव्हा विराट कोहलीबरोबर बोलताना अश्विन खूप भावुक झालेला दिसला. विराट त्याला मिठी मारत त्याचं सांत्वन करताना दिसला. ज्याचा व्हीडिओही व्हायरल होताच त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू होती आणि सामना संपताच त्याने निवृत्ती जाहीर केली.
भारताचा फिरकीपटू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गाबा कसोटी संपताच अश्विनने निवृत्ती घेत असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. रविचंद्रन अश्विन हा भारतीय कसोटी इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फिरकीपटू ठरला आहे. या दौऱ्यात त्याला आतापर्यंत फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.
ॲडलेडनंतर तो गाबा कसोटीच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर झाला आहे. गाबा कसोटी दरम्यान अश्विन टीम इंडियाच्या खेळाडूंना मिठी मारताना दिसला. त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी मारली. अश्विनने मुख्य प्रशिक्षक गंभीर यांच्याशीही बराच वेळ चर्चा केली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत येऊन निवृत्ती जाहीर केली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल. मी क्लब-क्रिकेट खेळत राहिन. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल, मी रोहित आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांबरोबर खूप आठवणी निर्माण केल्या आहेत, असे अश्विनने पत्रकार परिषदेत सांगितले.
अश्विन निवृत्ती जाहीर करताना नेमकं काय म्हणाला?
साहजिकच, खूप जणांचे आभार मानायचे आहेत. पण, जर मी बीसीसीआय आणि बाकीच्या सहकाऱ्यांचे आभार मानले नाहीत तर मी माझ्या कर्तव्यात कमी पडेन. मला त्यांच्यापैकी काही आणि सर्व प्रशिक्षकांची नावे सांगायची आहेत – रोहित, विराट, अजिंक्य आणि पुजारा ज्यांनी हे सर्व झेल स्लिपमध्ये घेतले आणि मला त्या विकेट मिळवण्यात मदत केली. मी आता कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही. हा खूपच भावुक करणारा प्रसंग आहे.
रविचंद्रन अश्विनची कसोटी कारकीर्द
आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 106 सामन्यात 537 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर 37 वेळेस 5 विकेट घेतले आहेत आणि 8 वेळा सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. अश्विनने 156 एकदिवसीय विकेट्सही घेतल्या आहेत. अश्विनने टी-20 मध्ये 72 विकेट घेतल्या. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिदत त्याने एकूण 765 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने फलंदाज म्हणूनही आपली छाप सोडली. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 3503 धावा आहेत आणि त्याने एकूण 6 कसोटी शतकं झळकावली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे एकूण 8 शतकं होती.