अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (२८ मार्च) रोजी कारवाई करत एका तरूणाला गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूसासह अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव शिवाजी देवकाते ( वय 34, रा.भिगवन, जि.पुणे ) असे आहे.
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदयाची माहिती काढत असतांना पथकास माहिती मिळाली होती की, करपडी फाटा, एसटी स्टॅण्ड, राशीन येथे एक इसम गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ सापळा रचला आणि संशयिताला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून ३१ हजार रूपये किंमतीचे गावठी पिस्तूल आणि १००० रूपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुकाराम कोल्हे ( रा.जवळा, ता.जामखेड, फरार) याचे कडून गावठी पिस्तूल आणल्याची कबुली दिली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस अंमलदार अमोल कोतकर, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, मनोज लातुरकर व महादेव भांड यांनी बजावली आहे.