आदर्श मतदान केंद्राची उभारणी; मतदारांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधांमुळे मतदारांकडून समाधान व्यक्त
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर शहरातील मतदारांमध्ये जनजागृतीसाठी महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. अहमदनगर विधानसभा मतदारसंघात मागील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. तसेच, महानगरपालिकेमार्फत झालेली आदर्श मतदान केंद्रांची उभारणी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हील चेअर, पाणी व इतर सुविधांमुळे मतदारांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या पुढाकारातून विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत अहिल्यानगर शहरात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान राबविण्यात आले. शहरातील विविध घटकातील नागरिक, संघटना, दिव्यांग बांधव, तृतीयपंथी आदींमध्ये जनजागृती करून शंभर टक्के मतदानाचा संकल्प करणारी शपथ सर्वांना दिली. महानगरपालिकेच्या बस सेवा देणाऱ्या बसेस, बस स्टॉप, कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या आदींवर फलक लावून, जिंगल्स वाजवून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. मतदारांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात आले. महानगरपालिकेतील देयके, विविध पावत्यांवर वॉटरमार्क द्वारे मतदार जागृतीचा लोगो छापण्यात आला. सोशल मीडियात अधिकाऱ्यांमार्फत मतदारांना मतदानासाठी आवाहन केले. शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम, कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली. विविध मॉर्निंग ग्रुप मध्ये चर्चासत्र घडवून आणत वेगळ्या प्रकारे जनजागृती करण्यात आली. बाईक रॅलीद्वारे संपूर्ण शहरात मतदान करण्याचा संदेश देण्यात आला.
तसेच, अहिल्यानगर शहरातील मतदारांना मध्ये मतदान केंद्र, यादीतील क्रमांक, खोली आदीची अचूक माहिती मिळावी, अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे मतदार स्लिप वितरण करण्यात आले. शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा, क्रमांक ४, रेल्वे स्टेशन समोर आणि महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालय, सावेडी या दोन ठिकाणी मतदान केंद्रांवर सजावट करण्यात आली. मतदारांसाठी मंडप, शोभिवंत झाडांच्या कुंड्या, फुग्यांची सजावट करण्यात आली. मतदान जागृतीचे फलक व सेल्फी पॉइंट लावण्यात आले. आयुक्त यशवंत डांगे यांनी मतदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शहरातील सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग बांधवांसाठी व्हील चेअरची व्यवस्था, हिरकणी कक्ष, तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. गेल्या दोन दिवसात मतदान केंद्रांची स्वच्छता करण्यात आली. तसेच, स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात आली.
शहरात रस्त्यांची कामे सुरू असल्याने मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यात अडथळा येऊ नये, यासाठी आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतः पाहणी करून मतदान केंद्र असलेल्या परिसरातील कामे मतदानाच्या दिवसापूर्वी पूर्ण करून घेतली. जिथे कामे प्रगतीपथावर होती, तेथे उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे मतदारांची गैरसोय टळली व मतदान वाढीवर चांगला परिणाम झाला. अहमदनगर मतदारसंघात मागील निवडणुकीत ५८.२८ टक्के मतदान झाले होते. यंदा त्यात वाढ होऊन ६३ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. नागरीक, मतदारांनी महानगरपालिकेच्या प्रयत्नांना साथ देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आयुक्त यशवंत डांगे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.