विकासकामे वेळेत पूर्ण करावीत | मनपा कामकाजाचा जिल्हाधिकार्यांकडून आढावा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महानगरपालिकेच्या विविध विभागांची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत त्यांनी सर्वच विभाग प्रमुखांकडून चालू असलेल्या योजनांची व प्रकल्पांची सविस्तर माहिती घेतली. दरम्यान नागरिकांना तातडीच्या सेवा देण्याचे निर्देश देत विकासकामे वेळेत पूर्ण करण्यास सांगितले.
बैठकीदरम्यान पंकज आशिया यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा तातडीने आणि प्रभावी पद्धतीने मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करणे गरजेचे आहे. महानगरपालिकेची जबाबदारी केवळ विकासकामे करणे इतकीच नाही, तर ती कामे वेळेत आणि दर्जेदार रितीने पूर्ण होणे ही देखील तितकीच महत्त्वाचे आहे. विभागप्रमुखांना सूचना देत असताना सांघितले की, नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित कृती करा असे आदेश जिल्हाधिकारी तथा आयुक्त पंकज आशिया यांनी यावेळी दिली.
यावेळी आरोग्य, जलपुरवठा, स्वच्छता, बांधकाम, करसंकलन, विद्युत, बागकाम, नागरी सुविधा, मालमत्ता व्यवस्थापन, वसुली, शिक्षण आदी विभागांतील कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागप्रमुखांनी आपापल्या क्षेत्रातील प्रगती अहवाल सादर करताना येणार्या अडचणी व पुढील उपाययोजना देखील मांडल्या. जिल्हाधिकारी आशिया यांनी स्पष्ट निर्देश दिले की, कामांमध्ये पारदर्शकता आणि गती येणे आवश्यक आहे.
नागरिकांची सेवा हेच आपले सर्वोच्च प्राधान्यक्रम असावे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडावी. या बैठकित उपायुक्त विजय मुंढे, डॉ. संतोष टेंगळे, सहायक आयुक्त सपना वसावा, निखिल फराटे, जलअभियंता परिमल निकम, आस्थापना विभागप्रमुख मेहेर लहारे, शहर अभियंता मनोज पारखे, श्रीकांत निंबाळकर, अतिक्रमण विभागप्रमुख सुरेश इथापे, घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे, प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजन, संगणक विभागप्रमुख अंबादास आदी उपस्थित होते.