कृष्णा लॉजवर छापा | तिघांविरुद्ध गुन्हा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगरातील बुरुडगाव रोडवरील कृष्णा लॉजवर कोतवाली पोलिसांनी रविवारी सायंकाळी छापा टाकून देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत गणेश दिगंबर ससाणे (वय ४२), कुमार शामलाल नारंग (वय ४०) आणि महेंद्र शामलाल नारंग यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महीला पोलीस हेड कॉन्स्टेबल निता श्याम अडसरे यांनी तक्रार नोंदवली.
गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी लॉजवर छापा टाकला. बनावट ग्राहक म्हणून पोलीस कॉन्स्टेबल संकेत धिवर यांना पाठवण्यात आले. त्यांनी लॉजच्या काउंटरवर गणेश ससाणे याला ५०० रुपये दिले, ज्याची नोट क्रमांकासह नोंद झाली. खोलीत तपासणी केली असता प्रिया इंदा शेख (वय २४, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या नवी मुंबई) ही महिला आढळली.
तिने ससाणे आणि नारंग यांच्याकडून देहविक्रीसाठी दबाव टाकला जात असल्याचे सांगितले.पोलिसांनी काउंटरवरून ५०० रुपये आणि मॅनफोर्स निरोध पॅकेट जप्त केले. ससाणे याने लॉज महेंद्र नारंग यांच्यासह कराराने चालवत असल्याचे कबूल केले. पोलिसांनी प्रिया यांना महिला कॉन्स्टेबल प्रतिभा नागरे यांच्या ताब्यात दिले.कोतवाली पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध कलम ३, ४, ५, ६ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.