अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर-माळीवाडा परिसरात वेश्याव्यवसाय व अंमली पदार्थांच्या विरोधात नागरिक त्रस्त झाले असून आज विविध सामाजिक संघटनांनी कोतवाली पोलिस ठाण्यात निवेदन सादर करून कठोर कारवाईची मागणी केली. नगरचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर आणि महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसरात खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
या भागात मोठ्या प्रमाणावर निवासी घरे असून महिला व मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री उशिरापर्यंत असामाजिक प्रकार घडत असल्याने परिसरातील स्त्रिया, मुली व रहिवासी भयभीत आहेत.असे निवेदन संत शिरोमणी सावता महाराज उत्सव समिती, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती ,भिमशक्ती व माळीवाडा पंचमंडळ देवस्थान ट्रस्ट,या संघटना व माळीवाडा परिसरातील सर्व नागरिकांचे वतीने कोतवाली पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
बाबर बिल्डिंग परिसरात रात्री अल्पवयीन मुले गांजा व दारूचे सेवन करतात. नशा केल्यानंतर त्यांच्यात वैयक्तिक भांडणे होऊन मोठ्या आवाजात शिवीगाळ केली जाते, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होते. हा प्रकार भारतीय दंड संहिता कलम 370, 371 तसेच अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायदा, 1956 अंतर्गत गंभीर गुन्हा असून, संबंधितांवर तात्काळ गुप्त तपास करून कठोर कारवाई करण्यात यावी आणि अशा कृत्यांना कायमचा आळा घालावा, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी माळीवाडा देवस्थान,सावता महाराज उत्सव समिती, भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती आणि भिमशक्ती व माळीवाडा परिसरातील मोठ्या संख्नेने सामाजिक कार्यकर्ते व त्रस्त नागरिक भव्य संख्येने उपस्थित होते. जर हे प्रकार ८ दिवसात बंद झाले नाही तर आंदोलन करण्यात येणार आहे.