Crime News: आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील हिंजवडीपरिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई करत थायलंडच्या चार महिलांची सुटका केली आहे.
या प्रकरणी एका विदेशी दलाल महिलेला अटक करण्यात आली असून तिला हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. थायलंडच्या महिलांना जास्त पैशांचे आमिष दाखवून पुण्यात आणण्यात आले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना या तरुणींचे फोटो पाठवले जात होते.
लोणावळ्यात व्हिला बुक करून या परदेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. कारवाई दरम्यान थायलंडच्या चार महिलांची सुटका करण्यात आली असून दलाल महिलेकडून २० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.