अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नेवासा तालुक्यातील एका कृषी केंद्रावर कृषी विभागाने छापा टाकून त्याठिकाणी सुरू असलेल्या बनावट खताचा साठा जप्त केला. सुमारे 16 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेवासा तालुक्यातील जय किसान नावाचे हे दुकान कृषी विभागाने सील केले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांना मिळालेल्या माहितीनुसार नेवासा तालुक्यातील एका दुकानात बनावट खत निर्मिती होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, कृषी अधिकारी प्रताप कोपनर, बाळासाहेब कासार, रखमाजी लांडे, राहुल ठोंबरे, प्रवीण देशमुख, कृषी सहाय्यक दिलीप घोंळवे यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.
सदर छाप्यात खत निर्मितीसाठी लागणारी आवश्यक रसायने, खत, रिकाम्या खतांच्या बॅग, बॅग सिलिंग मशिन व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सदर कृषी केंद्राकडे घाऊक खत विक्रीचा कुठलाही परवाना तसेच उत्पादनाचा परवाना नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कृषी विभागाने सदर दुकान सील केले आहे.