अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या मुळा विभागातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या असून या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की मुळा पट्ट्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीमध्ये दोन चुलत बहिणी शिक्षण घेत आहे. बुधवारी (दि. १५) मुली रडत रडत घरी आल्यावर वडिलांनी काय झाले म्हणून विचारपूस केल्यावर तिने हकीगत सांगितली.
शाळेत गेले होते तर मधली सुट्टी झाल्यानंतर शाळा पुन्हा भरली असता मुख्याध्यापक लोहरे यांनीवर्गातील तीन-चार मुलींना म्हणाले, की संगणक रूम साफ करायची आहे म्हणून रूममध्ये घेऊन गेले. त्याचवेळी वर्गातील दोन मुलींना निघून जा असे म्हणाले. त्यानंतर त्यांनी दोन्ही अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला. असा प्रकार दुपारची सुट्टी झाल्यानंतर दुसऱ्या वर्गात नेऊन वेळोवेळी केला आहे.
त्यावेळी तू सदर प्रकार आम्हांला लवकर का नाही सांगितला नाही अशी विचारपूस केली असता तिने आम्हांला सांगितले, की लोहरे सर आम्हांला म्हणायचे की तुम्ही जर सदर प्रकाराबाबतघरी कोणाला सांगितले, तर मी तुम्हाला मारीन. त्यामुळे तुमचे पप्पाचे व माझे भांडण होईल, त्यामुळे आम्ही तुम्हांला सांगितले नाही अशी माहिती मुलीने दिली. नोव्हेंबर २०२४ पासून वेळोवेळी शाळेच्या आवारातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये दोन्ही अल्पवयीन मुलींशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत धमकी दिली.
याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुख्याध्यापक गोरख कुशाबा लोहरे (रा. माळेगाव, ता. अकोले) याचे विरुद्ध विविध कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हजारे करीत आहे.