MahaKumbh Mela 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात सहभागी झाले आहेत. १४३ वर्षांतून एकदाच येणाऱ्या या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत कोट्यवधी भारतीयांनी पवित्र स्नान केले असून आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिवेणी संगमात अमृतस्नान केले. जवळपास अर्धा तास मोदींनी गंगा आरती करत गंगा नदीला वंदन केले. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार (दि ०५) रोजी सकाळी महाकुंभ मेळ्याला उपस्थित राहण्यासाठी प्रयागराज येथे दाखल झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम असलेल्या त्रिवेणी संगमापर्यंत बोटीने प्रवास केला. यानंतर नदीत गुडघ्यापर्यंत उभे राहून प्रार्थना करताना त्यांनी ‘रुद्राक्षांच्या माळा धरून मंत्रांचा जप केला.
त्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमात पवित्र अमृतस्नान केले. यानंतर ते घाटावरच जप करताना दिसले. यावेळी संगम स्नानानंतर पंतप्रधानांनी सूर्यालाअर्घ्य दिले. यावेळी त्यांच्या हातात रुद्राक्षाची माळही होती. सुमारे १५ मिनिटे मंत्रोच्चार करत मोदींनी सूर्याची पूजा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बघण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले.