टाकळी ढोकेश्वर, भाळवणीत जरांगे पाटलांच्या स्वागताची तयारी; पारनेर पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त
पारनेर / नगर सह्याद्री :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या आझाद मैदानाकडे कूच सुरू केले आहे. या आंदोलनाला मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. जरांगे पाटील अहमदनगरमधील आळेफाटा मार्गे शिवनेरीला मुक्काम करून पुढे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. येत्या 29 ऑगस्ट रोजी ते आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनाला पारनेर तालुक्यातूनही मोठा प्रतिसाद मिळत असून, भाळवणी आणि टाकळी ढोकेश्वर येथे जरांगे पाटलांचे जंगी स्वागत करण्याची तयारी सुरू आहे.
पारनेर तालुक्यातील मराठा समाज मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहे. स्थानिकांनी भाळवणी आणि टाकळी ढोकेश्वर येथे स्वागताची जोरदार तयारी केली आहे. या रॅलीदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाळवणी, टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौक, पारनेर चौक आणि कापरी चौक येथे सुरक्षा व्यवस्था तैनात आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक बेल्ह्यावरून आळकुटी मार्गे वळवण्यात आली आहे, तर पारनेर-भाळवणी दरम्यानची वाहतूक सुपा मार्गे नगरकडे वळविण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थांना त्रास होऊ नये आणि आंदोलन सुरळीत पार पडावे यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.