मुंबई : नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच फटका बसला, त्यात भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे भाजपने विधानसभेची तयारी आणि रणनिती आखायला सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्ष त्याची तयारी करत आहेत. त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या (Mahapalika) निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे विधानसभेबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचीही भाजप जोरदार तयारी करत आहे. दूध पोळल्यानंतर ताकही फुंकून प्यावं लागतं अशी म्हण आहे. त्यातूनच भाजपने विधानसभा निवडणुकांसोबतच स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महापालिकांच्या निवडणुकांचाही आढावा सुरू केला आहे.
कोरोना काळापासून अनेक महापालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. खरंतर एखाद्या महापालिकेवर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रशासन प्रशासक असू शकत नाही. पण, कोरोना संकटापासून प्रशासनच महापालिकांचं कामकाज पाहत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर रद्द करण्यात आलं होतं. त्यामुळे, या निर्णयाची अद्यापही कायदेशीर लढाई सुरू असल्याने या निवडणुका रखडल्या आहेत. सध्या, या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. तेव्हापासून सातत्याने या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. निवडणूका कधी होतील याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मात्र, या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची तयारी आता भाजपने करायला सुरवात केल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे, राज्य निवडणूक आयोगानेही याबाबतही माहिती यापूर्वीच दिली होती.
भाजपच्या बैठकीत आगामी महापालिका, जिल्हा-परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकींच्या तयारीचा देखील आढावा घेण्यात आला आहे. या निवडणुका संदर्भात देखील पक्षाने योजना आखल्याची माहिती आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप वॉर्डवाइस प्रत्येकावर जबाबदारी देणार आहे. विधानसभा निवडणुकी बरोबरच महापालिकेची तयारी देखील भाजपने सुरू केली आहे.
21 जुलै रोजी होणाऱ्या पुण्यातील संमेलनात स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत देखील संकेत देण्यात येणार आहेत. त्यानुसार, राज्य सरकारच्या सर्व योजना प्रत्येक वार्डात, विभागात पोहोचावे यासाठी भाजप बुथस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे समजते.