अहिल्यानगर | नगर सह्याद्री
लग्नाचे आमिष दाखवून गरोदर महिलेचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संतोष देवराव गाडे (वय ४२, रा. टाकळी, अहमदनगर) याच्याविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एका २१ वर्षीय गरोदर महिलेचा छळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि गरोदर असतानाही मारहाण, शिवीगाळ आणि धमया दिल्या. २०२३ मध्ये औरंगाबादेतील एका सलूनमध्ये तिची संतोषशी ओळख झाली. तो वारंवार तिथे येत होता, ज्यामुळे त्यांचे प्रेमसंबंध जुळले. संतोषने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, पण नंतर लग्नास नकार दिला.
याप्रकरणी औरंगाबादेत गुन्हा दाखल झाला आणि तो तुरुंगात गेला. २७ सप्टेंबर २०२४ रोजी जेलमधून सुटल्यानंतर संतोषने पीडितेची माफी मागितली आणि पुन्हा लग्नाचे आमिष दाखवले. त्याने १९ नोव्हेंबर २०२४ रोजी पीडितेला अहिल्यानगरच्या निर्मल नगर, तपोवन रोड येथे भाड्याच्या खोलीत ठेवले. गरोदरपणाची माहिती दिल्यानंतर संतोषने तिला औरंगाबादेतील केस मागे घेण्यास सांगितले.
तिने नकार दिल्यावर त्याने तिला रोज मारहाण, शिवीगाळ आणि पोटातील बाळाला मारण्याची धमकी दिली. गरोदर असतानाही त्याने वारंवार अत्याचार केला. २२ जून २०२५ रोजी संतोषने पीडितेला नागपूरच्या छत्रपती स्क्वेअर येथे एकटी सोडली आणि तिची व पोटातील बाळाची कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिला. यावरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.