अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्याची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवासेना राज्याचे सहसचिव विक्रम अनिलभैय्या राठोड यांनी केली आहे. त्यांनी पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांना सविस्तर मागणीचे निवेदन दिले असून, या प्रकरणामागे पूर्वनियोजित कट आणि राजकीय सूडभावना असल्याचा आरोप त्यांनी केला.
निवेदनात म्हटले आहे की किरण काळे यांनी महापालिकेतील ७७६ रस्त्यांमध्ये झालेल्या सुमारे ४०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पुराव्यानिशी भांडाफोड केल्यावरच त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई राजकीय दबावाखाली झाली असून, तिची चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच खोट्या आरोपांवर दाखल झालेल्या गुन्ह्याची तात्काळ व सखोल चौकशी करण्यात यावी. चुकीची माहिती देणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी. रस्ते घोटाळ्याची स्वतंत्र व विशेष चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
याप्रकरणाची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही दखल घेतली असून, लोकायुक्त व मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच यापूर्वीही काळे यांनी एमआयडीसी आयटी पार्क संदर्भात आवाज उठवल्यानंतर त्यांच्यावर अशाच स्वरूपाचा खटला दाखल झाल्याची आठवण राठोड यांनी करून दिली आहे. लोकशाही व्यवस्थेत विरोधकांना आवाज उठवण्याचा अधिकार आहे. पण जर त्याच्या बदल्यात खोटे गुन्हे दाखल होत असतील, तर ती बाब धोकादायक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास शिंदे, दिलदार सिंग बीर, मुन्ना भिंगारदिवे, विशाल गायकवाड,चंद्रकांत उजागरे, जिग्नेश जग्गड, पिनू भोसले, श्याम सोनवणे, नरेश भालेराव, किरण बोरुडे, अक्षय नागापुरे, स्नेहल काळे, स्वप्निल पाठक, वर्षा जगताप, उषा वाखोरे, मनीषा काळे, विलास उबाळे,आदी सह पदाधिकारी उपस्थित होते.