पुणे / नगर सह्याद्री –
गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. ओबीसी आरक्षण आणि इतर कारणांमुळे या निवडणुका अद्यापर्यंत झालेल्या नाहीत. राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पुढच्या काही महिन्यांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारीखा जाहीर केल्या जाणार असे बोलले जात होते. मात्र, सर्वेाच्च न्यायालयात तारीख पे तारीख अशी परिस्थिती या निवडणुकीविषयी झालेली दिसत आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या तारखेत निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात येईल असे दिसत होते. मात्र, परत एकदा ५ मार्चला याची सुनावणी होणार आहे. यामुळे पुन्हा एकदा इच्छुकांचा हिरमूड झाला आहे. विधानसभेची धामधुम संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने अनेकांनी तेव्हापासूनच सुरूवात केली. निवडणुका लांबणीवर पडल्याने पुन्हा एकदा इच्छुकांच्या पदरी निराशा आली आहे. राज्यातील सर्व स्थानिक संस्थांचा कारभार सध्या प्रशासनाच्या हाती असल्याने राजकीय पक्षांमध्ये चलबिचल सुरू आहे.
ओबीस आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वेाच्च न्यायालयाने सुनावणी घेऊन निकाल दिल्यानंतर पुढील काही महिन्यात निवडणुका होतील, अशी आशा निवडणूक लढवणाऱ्यांना आहे. त्यामुळे राजकीय मंडळींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुकांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. काही इच्छुकांनी तर गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मकरसंक्राती निमित्त हळदी कुंकवाचे कार्यक्रम, देव दर्शन यात्रांचे नियोजन करण्यात आले आहे. अॅाक्टोबरमध्ये या निवडणुका होऊ शकतात असे सांगण्यात आले आहे. ५ मार्चला सर्वेाच्च न्यायालय निवडणुकीची तारीख जाहीर करणार का की पुन्हा एकदा पुढची तारीख मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.