बेजबाबदार शिक्षकांमुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा ही निकृष्ट | वरिष्ठ शालेय प्रशासनाकडे तक्रार करणार
पारनेर । नगर सहयाद्री
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये पळशी येथे असलेल्या शासकीय आश्रम शाळेमध्ये निकृष्ट दर्जाचा आहार विद्यार्थ्यांना दिला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचे समजल्यानंतर पळशी गावचे सरपंच प्रकाश राठोड ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव, संपत जाधव, गणेश शिंदे यांनी आश्रम शाळेमध्ये जात पाहणी केली यावेळी त्यांना अनेक चुकीच्या बाबी लक्षात आल्या.
शासन हे आदिवासी भागातील आश्रम शाळांमध्ये निवासी विद्यार्थ्यांना दोन वेळचे भोजन देते या पळशी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार अतिशय निकृष्ट दर्जा असल्याचे आढळून आले आहे. एका बाजूस शासन आदिवासी वाड्या वस्ती व झोपड्यांमध्ये अधिवास करणाऱ्या आदिवासी बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या योजना शासन स्तरावर राबवत आहे. दुसऱ्या बाजूस मात्र शासन चालवत असलेल्या पारनेर तालुक्यातील पळशी आश्रम शाळांमध्येच निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचे आढळून आले आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार हा निकृष्ट दर्जाचा आहे. पळशी गावचे सरपंच प्रकाश राठोड यांनी शाळेत जाऊन पाहणी केली यावेळी शाळेतील भाजीपाला अन्नधान्य व किराणामाल या पोषण आहार मध्ये त्यांना किड्या मुंग्या अळाया व बुरशी लागलेले सडलेले पदार्थ दिसले त्या ठिकाणी निकृष्ट दर्जा असलेलाच माल होता. त्यामुळे शाळा व्यवस्थापन हे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे. शासन आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना व अनुदानही देत असते परंतु ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही हीच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. पळशी येथील शासकीय आश्रम शाळेमध्ये आहाराबरोबर शिक्षणाची सुद्धा दर्जा अतिशय खालच्या स्तराचा आहे.
या ठिकाणी विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवलाच जात नाहीत. बेजबाबदारपणे शिक्षक वागत असून विद्यार्थ्यांकडे शिक्षकांचे लक्षच नाही हा सुद्धा प्रकार समोर आला आहे. असे सरपंच प्रकाश राठोड यांनी या ठिकाणी पाहणी व चौकशी केल्यानंतर लक्षात आले आहे. त्यांनी यावेळी राजुर प्रकल्प अधिकारी यांना सुद्धा फोन करून संबंधित विषयाची कल्पना कळवली आहे तसेच. विभागीय प्रकल्प अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार करणार असल्याचे सरपंच राठोड यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडे शाळेचे लक्ष नसल्याचे चित्र दिसत असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ येथे सुरू आहे. हा संपूर्ण प्रकार येथे यापुढे चालू देणार नाही तसेच निकृष्ट पोषण आहार मिळत असल्याची तक्रार सुद्धा वरिष्ठांकडे करणार आणि विद्यार्थ्यांना पोषक आणि चांगला आहार पुरवला गेला नाही तर आंदोलन केले जाईल असा इशारा सुद्धा सरपंच प्रकाश राठोड यांनी शालेय प्रशासनाला दिला आहे. शाळेत निकृष्ट दर्जाचं शालेय पोषण आहार देणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील वरिष्ठांकडे करणार आहे.
निकृष्ट दर्जाचा आहार
पळशी येथील आश्रम शाळेमध्ये पळशी परिसरातील अनेक आदिवासी शिक्षण घेत आहेत परंतु शाळेमधील शिक्षणाचा दर्जा अतिशय खालच्या पातळीचा आहे. विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण सुद्धा चांगले दिले जात नाही. विद्यार्थ्यांना दिले जाणारा आहार सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे. यासंदर्भात लिखित तक्रार वरिष्ठांकडे करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणार.
प्रकाश राठोड (सरपंच, पळशी)
नववी दहावीला गणित विषय शिकवलाच जात नाही..
पळशी येथील आश्रम शाळेतील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय शिकवला जात नाही. मुख्याध्यापकांकडेच या दोन्ही वर्गांचा गणित विषय आहे. ही गंभीर बाबच सरपंच प्रकाश राठोड यांच्या लक्षात आली. त्यामुळे आहारा बरोबर पळशी येथील शाळेचा शैक्षणिक दर्जा सुद्धा अतिशय निकृष्ट आहे. या संपूर्ण प्रकाराची तक्रार वरिष्ठांकडे करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.