पुणे / नगर सह्याद्री
Pooja Khedkar Case: खासगी कारवर लाल दिवा लावल्याने वादात सापडलेल्या पुण्यातील वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांसंदर्भातील वेगळीच शंका आता उपस्थित केली जात आहे. याच प्रकरणामध्ये आता थेट केंद्रातील मोदी सरकारने पुणे पोलिसांना विशेष आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलीला नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट मिळावं म्हणून तिच्या आई-वडिलांनी एक मोठा कट रचल्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.
लेकीला गैरफायदा घेता यावा म्हणून केला हा प्रकार…
समोर आलेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांचे आई वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांनी घटस्फोट घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या दोघांचा खरंच घटस्फोट झाला होता की त्यांनी लेकीच्या फायद्यासाठी घटस्फोटाचा बनाव केला होता याचा तपास करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून पुणे पोलिसांना देण्यात आले आहेत. पूजा खेडकर यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी हे सारं करण्यात आल्याचे समजते. पूजा यांचे आईवडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्यामध्ये घटस्फोट झाल्याचे कागदोपत्री दाखवून नॉन क्रिमीलयर सर्टिफिकेट मिळवण्यात आलं. आता या प्रकरणाचा तपास हाती घेण्यात आला आहे.
घटस्फोट झाला म्हणतात अन् दुसरीकडे प्रतिज्ञापत्रात वेगळीच माहिती
एकीकडे दिलीप खेडकर आणि पूजा खेडकर घटस्फोटीत असल्याचं सांगितलं जात असाना दुसरीकडे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वेगळीच माहिती समोर आली. 2024 ची लोकसभा निवडणूक दिलीप खेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीकडून लढवली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलीप खेडकर यांनी मनोरमा खेडकर यांचा पत्नी असा उल्लेख केला होता. त्याचबरोबर खेडकर कुटुंबाचीयांच्या मालकीच्या मालमत्तांचा ताबा दोघांकडे संयुक्तपणे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने या दोघांमध्ये खरंच घटस्फोट झाला होता का? याची चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिलेत.
आज मसुरीला पोहोचल्या नाही तर…
दरम्यान, दुसरीकडे पूजा खेडकर यांना मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रात चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी युपीएससी ने दिलेली मुदत आज संपत आहे. पूजा खेडकर आज मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्रात पोहचणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी केलेले कथित गैरप्रकार समोर आल्यानंतर युपीएससी ने त्यांचं प्रशिक्षण थांबवलं. त्यानंतर पूजा खेडकर यांना जुलैपर्यंत मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्रात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. मात्र वाशीममधून निघाल्यावर पूजा खेडकर या गायब झाल्या आहेत. त्या जर आज मसुरीमधील प्रशिक्षण केंद्रात पोहचल्या नाहीत तर युपीएससीकडून पुढील कारवाईला सुरुवात होऊ शकते.