माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं
सोलापूर | नगर सह्याद्री
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर भाजपचे राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देणारे विधान केले आहे. अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाहीफ असे म्हणत त्यांनी अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे हे विधान करतानाच सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अजित पवार यांना ओपन चॅलेंज देणार्या बाळराजे पाटील यांचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक आमदार अमोल मिटकरी यांनी घेतला आहे. पाटील यांच्या अजित पवार यांच्याबद्दल बोट दाखवून केलेल्या विधानावर मिटकरींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अनगरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होते. या पदासाठी ३ महिला उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. यात भाजपाकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता अजिंयराणा पाटील, राष्ट्रवादीच्या (अजित पवार) उज्ज्वला थिटे आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, मंगळवारी झालेल्या अर्जांच्या पडताळणीनंतर ही निवडणूक बिनवरोध झाली आहे.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्ज पडताळणीत राष्टवादीच्या उज्ज्वला थिटे यांच्या नामनिर्देशन पत्रात सूचकाची सही नसल्यामुळे आक्षेप घेतला गेला. याप्रकरणी चौकशीअंती उज्ज्वला थिटे यांचा अर्ज अपात्र ठरवला असल्याची माहिती अनगर नगरपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली आहे. दरम्यान, अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी केवळ भाजपाच्या १७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. हे सर्व बिनविरोध झाले आहेत. भाजपाचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. त्यानंतर राजन पाटील यांच्या कुटुंबियांनी व कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयाबाहेर एकच जल्लोष केला.
आमदार राजन पाटलांच्या पुत्राचं अजित पवारांना आव्हान
अनगर नगरपंचायतच्या निवडणुकीत राजन पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला पहिल्यांदाच आव्हान देण्याचा प्रयत्न झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिलेल्या आव्हानामुळे येथील बिनविरोध निवडणुकीच्या परंपरेला ब्रेक लागला होता. मात्र, राष्ट्रवादीच्या उज्ज्वला धिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलं आहे. नगरपंचायत कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्ते जल्लोष करत असताना बाळराजे पाटील एका कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून जल्लोष करत होते. त्याचवेळी ते कॅमेर्याकडे बोट दाखवून अगदी त्वेषाने म्हणाले, अजित पवार सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय.
पवारांना डिवचणार्या बाळराजे पाटलांना मिटकरींचे रोखठोक प्रत्युत्तर
राजन पाटील आणि त्यांची दोन्ही वाया गेलेली मोकाट कार्टी यांना सत्तेचा अतिमाज आला आहे. ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्याबद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊच. पण तूर्तास या औलादींच्या मस्तीच्या वागण्याने मालकाला भिकारी बनवेल.. तुर्तास इतकेच असा जिव्हारी लागणारा वार अमोल मिटकरी यांनी बाळराजे पाटील यांच्यावर केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर नगरपंचायत निवडणूक चर्चेचा विषय ठरली.

अजितदादा माफ करा, मुलगा चुकला, त्याला पदरात घ्या.., बाळराजेंच्या चॅलेंजवर अनगरच्या राजन पाटलांचा माफीनामा
राजन पाटील म्हणाले, “आमच्या गावात कधी निवडणूक झाली नाही. यंदा निवडणूक लागली आणि तरुण पोरांचा उत्साह वाढला. मात्र, ही निवडणूकही बिनविरोध होणार म्हटल्यावर तरुणांनी त्याचा जल्लोष करण्याचा प्रयत्न केला. त्यात आमच्या मुलाने जे काही वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करणार नाही. कारण तो राजकारणात अजून खूप लहान आहे. त्याच्या तोंडून नकळत काही वक्तव्य गेलं असेल तर त्याचा वडील म्हणून मी पाटील कुटुंबाच्या वतीने माफी मागतो. थोरले पवार (शरद पवार) व राष्ट्रवादीपासून मी आता दूर आहे. मात्र, त्याला अजित पवार कारणीभूत आहेत असं मी म्हणणार नाही. मी राष्ट्रवादीपासून दूर असण्याला अनेक कारणं आहेत. मी त्या दोघांचंही नेतृत्व मान्य करतो.
माझ्या वैभवात दोन्ही पवारांचा सिंहाचा वाटा : राजन पाटील
“मी आजवर जे वैभव उभं केलं आहे त्यात शरद पवार व अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. आमच्या मुलाकडून नकळत, उत्साहाच्या भरात, भावनेच्या ओघात अपशब्द निघाला असेल. त्याबद्दल मी अजित पवारांची पूर्ण अंतःकरणापासून दिलगिरी व्यक्त करतो, त्यांची क्षमा मागतो. मी त्यांच्यापुढे नतमस्तक होतो आणि आता हा विषय थांबवावा अशी विनंती करतो.”
राजन पाटलांच्या मुलावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची टीका
बाळराजेंच्या या व्हिडीओवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे (अजित पवार) विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, सुरज चव्हाण यांनी राजन पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत अजित पवारांची जाहीर माफी मागितली.
“अजित पवारांनी माझ्या मुलाला पार्थ समजून पदरात घ्यावं”
दरम्यान, बाळराजे पाटलांच्या वक्तव्यानंतर आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी, सूरज चव्हाण यांच्यासह अनेकांनी टीका केली. त्यावर राजन पाटील म्हणाले, “सर्वांनाच राग आला असेल आणि हे स्वाभाविक आहे. मी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून विनंती करतो की आपलाच मुलगा समजून त्याला माफ करा. मी अजित पवारांना विनंती करतो की तुमचा पार्थ जसा आहे त्याच जागी बाळराजेला ठेवून त्याला पदरात घ्या. तो चुकला असेल, त्याला माफ करा. अजित पवारांनी त्याला पार्थ समजून पदरात घ्यावं.”



