श्रीगोंदा । नगर सहयाद्री:
श्रीगोंदा तालुक्यात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्ष व गटांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढण्याचा नारा देत श्रीगोंद्यात तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री बबनराव पाचपुते, विद्यमान आमदार विक्रमसिंग पाचपुते यांना टक्कर देण्यासाठी अनेक विरोधकही आता अजितदादांच्या छत्राखाली आले आहेत. त्यामुळे श्रीगोंद्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र दिसत आहे.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा राजेंद्र नागवडे, राहुल जगताप, घनश्याम शेलार, बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रय पानसरे, अण्णासाहेब शेलार तसेच भगवानराव पाचपुते हे नेते सांभाळणार आहेत. स्थानिक पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विविध कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या आहेत. श्रीगोंदा शहराची जबाबदारी घनश्याम शेलार यांच्याकडे देण्यात आली असून मांडवगण, कोळगाव आणि येळपणे या जिल्हा परिषद गटांची जबाबदारी माजी आमदार राहुल जगताप यांच्याकडे देण्यात आली आहे.

तर आढळगाव, बेलवंडी आणि काष्टी या गटांची धुरा राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार व बाळासाहेब नहाटा यांच्या हाती देण्यात आली आहे. या नव्या राजकीय रचनेमुळे तालुक्यातील इतर गटांना फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. नगराध्यक्षपद एकच, दावेदार मात्र अनेक! अशी परिस्थिती निर्माण झाली असून या पदासाठी अनेक दिग्गज नेते, नवीन चेहरे आणि तरुण कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
शहरातील विविध प्रभागांमध्ये बैठका, जनसंपर्क मोहिमा आणि विकासाच्या आश्वासनांची मालिका सुरू झाली आहे. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, घनकचरा, आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर मतदारांचे लक्ष केंद्रीत असून नागरिकांना पारदर्शक व विकासाभिमुख नेतृत्व अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. पक्षांतर्गत बैठकांनंतर उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता असून सध्या तरी श्रीगोंद्यातील राजकारणात एकच पद – दावेदार अनेक!’ अशीच स्थिती आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील ही निवडणूक रंगतदार आणि अत्यंत रोचक होणार, असे संकेत राजकीय वर्तुळात दिले जात आहेत.



