पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील भाळवणी गावात येत्या ६ नोव्हेंबर रोजी पारनेरमध्ये होणाऱ्या सुजित झावरे पाटील यांच्या शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्यासाठी लावलेल्या प्रचारफ्लेक्स बोर्डचे रात्री अज्ञात व्यक्तींनी नुकसान केले. या घटनेमागे राजकीय द्वेष असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुजित झावरे पाटील यांनी सोशल मीडियावरून या घटनेचा तीव्र निषेध केला. त्यांनी म्हटले आहे की, भाळवणी येथे अज्ञात व्यक्तींनी फ्लेक्स बोर्ड काढून टाकले. पारनेर तालुक्याचे राजकारण इतक्या खालच्या स्तरावर जाईल, अशी अपेक्षा नव्हती. तुम्ही फ्लेक्स काढू शकता, पण जनतेच्या मनातून काढू शकणार नाही. उलट, या घटनेमुळे ६ नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला अधिक संख्येने जनता उपस्थित राहील.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही या कृत्याचा निषेध करत, वैचारिक सुसंस्कृतपणा असलेल्या तालुक्यात अशी कृत्ये राजकारणाला बदनाम करतात,असे म्हटले. विरोधकांकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. ही घटना पारनेर तालुक्यातील राजकीय तणाव वाढवणारी ठरली असून, पक्षप्रवेश सोहळ्याला नव्याने जोर येण्याची शक्यता आहे.



 
                                    
