मुंबई। नगर सहयाद्री
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि सात वर्षांपासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, त्यांना एका राष्ट्रीय पक्षाकडून मोठी ऑफर मिळाल्याची चर्चा रंगली आहे.
जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच नव्या नेतृत्वाला संधी द्यायला हवी असे विधान करत संकेत दिला होता. अखेर आज त्यांनी अधिकृतरित्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी याआधी भाजप आणि अजित पवार गटात जाण्याच्या चर्चांना वारंवार नकार दिला होता.
मात्र, त्यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनीही सूचक विधान करत, “जयंत पाटील आमच्याकडे आले, तर आम्ही स्वागत करू” असे म्हटले आहे. जयंत पाटील हे अलीकडील काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिले होते. त्यामुळे त्यांच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जयंत पाटील यांना एका राष्ट्रीय पक्षाकडून ऑफर मिळाली आहे. यावर त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली, तरी त्यांच्या आगामी निर्णयाकडे राज्याच्या राजकारणात उत्सुकतेने पाहिले जात आहे.त्यांची पुढील रणनीती, कोणत्याही पक्षासोबत जाण्याचा निर्णय किंवा स्वतंत्र राजकीय भूमिका घेतल्यास, राज्याच्या आगामी राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.