Maharashtra Political News; आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडवणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अहिल्यानगरमधील स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी संघटनेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोरे यांनी समर्थकांसोबत शिंदे गटात प्रवेश केला. रवींद्र मोरे यांच्या पक्षप्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना मोठा धक्का मानला जात आहे.
रवींद्र मोरे यांनी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसाठी आंदोलने केली होती. रवींद्र मोरे यांच्या आंदोलनामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठं बळ मिळालं होतं. मात्र, आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोरे यांनी शेट्टींची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. मोरे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने नगरमधील राजकीय गणित बदलणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मोरे यांनी संघटनेची साथ सोडल्याने नगरमधील राजू शेट्टी यांच्या संघटनेची ताकद कमकुवत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे रवींद्र मोरे यांनी शिंदे गटाला साथ दिल्याने एकनाथ शिंदे यांची जिल्ह्यातील ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
एका ऑनलाइन माध्यमांशी बोलताना रवींद्र मोरे म्हणाले, ‘मी गेल्या २० वर्षांपासून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कार्यरत होतो. शेतकर्यांचे प्रश्न आंदोलनाने सुटणार नाहीत. त्यासाठी सत्ता हवी. तसेच निर्णय घेण्याची ताकद हवी. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सेनेत प्रवेश केला. आम्ही आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक पद्धतीने काम करू. राजू शेट्टी यांनी सर्व सहाकार्य केलं. आम्हाला त्यांच्याबद्दल कोणतीही नाराजी नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सेनेत प्रवेश करत आहे’.