अहमदनगर | नगर सह्याद्री:-
लोकसभा निवडणुकीनंतर ज्येष्ठ नेते खा. शरद पवार हे गुरुवारी (दि.१८) नगर दौर्यावर आहेत. दोन दिवस त्यांचा नगर जिल्हा दौरा असणार आहे. नगरमध्ये ते मुक्कामी असून यावेळी खा. शरद पवार हे नगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघानिहाय आढावा देखील घेणार असल्याची माहिती आहे.
गुरूवारी व शुक्रवारी खा. शरद पवार हे नगर जिल्ह दौर्यावर आहेत. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर खा. पवार हे नगर जिल्ह्यात येत असल्याचे महत्व प्राप्त झाले आहे. शुक्रवारी दिवंगत अशोक भांगरे यांच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीत दोन गट झाल्यानंतर आ. प्राजक्त तनपुरे व आ. रोहित पवार हे पवारांसोबत होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रारंभी खा. नीलेश लंके शरद पवार यांच्यासोबत आले. आमदार संग्राम जगताप, आशुतोष काळे, किरण लहामटे हे अजित पवारांसोबत गेले.
ज्या मतदार संघातील आमदारांनी साथ सोडली. तेथे शरद पवार यांनी विशेष लक्ष घातले आहे. संबधित मतदार संघाचा शरद पवार स्वतः आढावा घेणार आहे. त्यामुळे शरद पवारांच्या दोन दिवसीय दौर्याला महत्व प्राप्त झाले आहे. पवार यांच्या या दौर्यानंतर जिल्ह्यातील जागावाटपासवर चर्चा केली जाणार आहे.
सात मतदारसंघांवर पवार गटाचा दावा
गत विधानसभा निवडणुकीत किरण लहामटे, अशुतोष काळे, संग्राम जगताप, निलेश लंके, रोहित पवार, प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. परंतु, राष्ट्रवादीच्या फाटाफुटीत आ. रोहित पवार, तनपुरे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत राहिले. तर लोकसभेला लंके यांनी अजित दादांची साथ सोडत शरद पवारांसोबत आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कोपरगाव, नगर शहर, पारनेर, राहुरी, कर्जत-जामखेडसह श्रीगोंदा या मतदारसंघांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा सांगितला असल्याची माहिती आहे.