Crime News: पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसण्याऐवजी दिवसेंदिवस धक्कादायक प्रकार उघड होत आहेत. नुकत्याच घडलेल्या दोन घटनांनी शहरात खळबळ उडवली आहे. पहिल्या घटनेत गुन्हे शाखेतील पोलिसावर थेट कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे.
पुण्यातील लॉ कॉलेज रोड परिसरात रविवारी (५ ऑक्टोबर) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. ड्यूटी संपवून घरी जात असताना गुन्हे शाखा युनिट ३ मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमोल काटकर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी कोयत्याने हल्ला केला.
प्राथमिक माहितीनुसार, रस्त्यावर ‘कट मारल्याच्या’ वादातून ही घटना घडली. या हल्ल्यात काटकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे “पोलिसच असुरक्षित असतील तर सामान्य नागरिकांचं काय?” असा सवाल उपस्थित होतो आहे.



