पोलिसांनी १३० मॉडिफाइड सायलेन्सरवर चालविला रोडरोलर
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कर्णकर्कश आवाज व कानठळ्या बसविणार्या १३० बुलेटवर कारवाई करण्यात आली. बुलेटला बसविलेले मॉडिफाइड सायलेन्सर जप्त करून रोडरोलरच्या सहायाने नष्ट करण्याची कारवाई शुक्रवारी पोलिसांनी केली असून, यापुढेही ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याची माहिती शहर पोलीस विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी दिली.
शहरात तरुणामध्ये बुलेट घेण्याची क्रेझ वाढत असून, या बुलेटचे सायलेन्सर मॉडिफाइड करून घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. शहरातील रस्त्यावर मॉडिफाइड सायलेन्सर बुलेट बिनधास्त धावत असल्याने त्याच्या कानठळ्या बसणार्या आवाजाचा वाहनचालकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या.
त्यामुळे कोतवाली, तोफखाना, भिंगार व शहर वाहतूक शाखेने महिनाभरात शहरात कारवाईची मोहीम राबविली. यात १३० बुलेटवर कारवाई करून त्यांचे मॉडिफाइड सायलेन्सर जप्त करण्यात आले. चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलले मॉडिफाइड सायलेन्सर शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता आयुर्वेद चौक येथील रस्त्यावर मांडून त्यावर रोडरोलर चालविण्यात आला. हे सर्व सायलेन्सर नष्ट करण्यात आले.
पोलीस उपअधीक्षक टिपरसे यांच्यासह कोतवाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, तोफखान्याचे निरीक्षक जगदीश भांबळ, भिंगार पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मुलगीर, वाहतूक शाखेचे निरीक्षक बोरसे आदी यावेळी उपस्थित होते.
मॉडीफाईड सायलन्सर बसवून देणार्यांवर कारवाईचा बडगा
शहरात बुलेटचे सायलेन्सर मॉडिफाइड करून चालविल्याने कानठळ्या बसविणार्या आवाजाचा नागरिकांना त्रास होत आहे. यासंदर्भात शहरात कारवाई राबवून असे सायलेन्सर जप्त करून नष्ट करण्यात आले आहे. यापुढे की कारवाई अशीच चालू राहणार असून, आता मॉडीफाईड सायलन्सर बसवून देणार्यांवर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.
-डॉ.दिलीप टिपरसे, पोलीस उपअधीक्षक



