अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरातील सावेडी उपनगरामध्ये हुक्का पार्लरवर तोफखाना पोलिसांनी कारवाई करत तंबाखू, हुक्का पिण्यासाठी वापरत असलेले साहित्य असा सहा हजार 200 रूपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (4 एप्रिल) रात्री पाईपलाईन रस्त्यावरील सहकार नगर परिसरात करण्यात आली.
याप्रकरणी सुमित संजय ढापसे (वय 20, रा. वंजार गल्ली, रामचंद्रखुंट, अहिल्यानगर) या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव मंदिराजवळ ‘हाऊस ऑफ स्मोक’ या नावाने हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती.
त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सुचना केल्या. पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शुक्रवारी रात्री सदर हुक्का पार्लरवर छापा टाकला असता, हुक्का पिण्यासाठी वापरले जाणारे भांडे, प्लास्टिकचे डबे व इतर साहित्य आढळून आले.
पोलिसांनी संपूर्ण साहित्य जप्त केले असून, पोलीस अंमलदार सुजय हिवाळे यांच्या फिर्यादीवरून सुमित संजय ढापसे विरोधात सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध व व्यापार व वितरण विनियमन) अधिनियम 2003 चे सुधारित अधिनियम 2018 कलम 4 (अ)/21 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.