Maharashtra Crime News: शहरातील उच्चभ्रू परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, प्रोफेसर कॉलनीतील एका घरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी एक बांगलादेशी तरुणी आढळून आली असून, तिची सुटका करून तिला आशादीप वस्तीगृहात हलवण्यात आले आहे.
या प्रकरणात घरमालकीण असलेल्या एका महिलेविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेविरुद्ध यापूर्वीदेखील अशा स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पुण्यातील एका सामाजिक संस्थेच्या तक्रारीच्या आधारे करण्यात आली. बांगलादेशी तरुणीला बळजबरीने डांबून ठेवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती संस्थेला मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
छाप्यादरम्यान पोलिसांना तिच्याकडे बांगलादेशातील ओळखपत्र आढळून आले आहे. ती भारतात कशी आली? कोणाच्या मदतीने आणि कोणत्या मार्गाने तिची या प्रकारात अडकवणूक झाली? या सर्व बाबींचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, वेश्याव्यवसायासारख्या गुन्हेगारी कृत्यांसाठी उच्चभ्रू वस्त्यांमधील घरे वापरली जात असल्याची गंभीर बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.