अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत. जयराम बाजीराव काळे (वय 34 रा. कजबे वस्ती, तपोवन रस्ता, सावेडी, अहिल्यानगर) असे बेपत्ता झालेल्या अंमलदाराचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी आश्विनी जयराम काळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
अंमलदार जयराम काळे हे पोलीस मुख्यालयात नेमणुकीला आहेत. ते सोमवारपासून (7 जुलै) बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. त्यानंतर त्यांची पत्नी आश्विनी यांनी मंगळवारी (8 जुलै) सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली असून अंमलदार काळे यांचा शोध सुरू केला आहे. ते बेपत्ता होण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस अंमलदार रमेश थोरवे अधिक तपास करीत आहेत.