अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातून मुलाला वगळण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकांसाठी 12 हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात आरोपींनी लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, की तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या गुन्ह््यातून आपल्या मुलाला वगळण्यात यावे अशी मागणी तक्रारदाराने शेवगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माळी यांच्याकडे केली होती; ती मागणी मान्य करण्यासाठी 12 हजार रुपये लाचेची मागणी माळी यांच्याकडून करण्यात आली. या संदर्भात तक्रारदाराने अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 30 मार्च 2024 रोजी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेण्यात आली.
लाचेची रक्कम आरोपी आफताब नजीर शेख (वय-22 वर्षे, खाजगी नोकरी, रा. साईधाम सोसायटी, बोधेगाव, ता. शेवगाव) याच्याकडे देण्यास माळी यांनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी आफताब शेख याची पडताळणी केली असता आरोपीने सहायक पोलीस निरीक्षक माळी यांच्यासाठी लाचेची 12 हजार रुपये इतकी रक्कम स्वीकारण्याचे सिद्ध झाले.
त्यामुळे आरोपीच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्र विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे अहिल्यानगर येथील पोलीस निरीक्षक राजू आल्हाट व त्यांचे सहकारी पोहेकॉ राधा खेमनर, पोलीस अंमलदार सचिन सुद्रुक, पोलीस अंमलदार गजानन गायकवाड, पोहेकॉ दशरथ लाड यांनी ही कारवाई केली.