नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ₹६,०००/- (₹२,०००/- चे तीन हप्ते) दिले जातात. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, या योजनेचा २१ वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात (संभाव्यतः ५ नोव्हेंबरपर्यंत) जमा होण्याची शक्यता आहे, मात्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
दरम्यान, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात यंदाचा हप्ता जमा होणार नाही. याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:
ई-केवायसी (e-KYC) अपूर्ण असणे: योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे पैसे अडकतील. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसी पूर्ण करता येते.
आधार-बँक खाते लिंक नसणे: शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी जोडलेले (Aadhaar Seeding) असणे आवश्यक आहे. हे काम बँकेत जाऊन पूर्ण करता येते.
चुकीची कागदपत्रे: अर्ज करताना किंवा केवायसीच्या वेळी चुकीची माहिती किंवा कागदपत्रे सादर केल्यास लाभ थांबवला जातो.
आगाऊ हप्ता मिळालेले शेतकरी: पूरग्रस्त भागातील (उदा. पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर) ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात २१ वा हप्ता आधीच जमा झाला आहे, त्यांना यावेळी पैसे मिळणार नाहीत.
तुमचा स्टेट्स तपासण्यासाठी:
-पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
-‘Beneficiary Status’ (लाभार्थी स्थिती) या पर्यायावर क्लिक करा.
-आधार क्रमांक/खाते क्रमांक/मोबाईल क्रमांक टाकून स्थिती तपासा.



